मूर्तिकार बाबी बांदेकर
मातीला आकार देणाऱ्या हातांचा, श्रद्धेला रूप देणाऱ्या कलाकाराचा आणि पंचकन्यांनी अखंड जपलेल्या वारशाचा प्रेरणादायी प्रवास
बाबी बांदेकर या नावाने सर्वदूर परिचित असलेले सुप्रसिद्ध मुर्तिकार त्यांचे पूर्ण नाव विष्णू भगवान बांदेकर.
निसर्गसौंदर्याची परिसीमा, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेची समृद्ध शिदोरी, अगणित नामवंत व्यक्तिमत्त्वांना जन्म देणारी आणि कलाकारांची जणू खाणच असलेली आपली कोकणभूमी… याच कोकणातील वेंगुर्ल्याच्या तुळस या छोट्याशा गावात, भगवान बांदेकर यांच्या घरात १० जुलै १९४७ रोजी विष्णूचा जन्म झाला.
कालांतराने या विष्णूच्या कर्तृत्वाला आणि व्यक्तिमत्त्वाला ‘बाबी’ या नावाने अशी ओळख मिळाली की, ते नावच त्यांच्या कलेचे आणि व्यक्तिमत्त्वाचे पर्यायवाची बनले.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, खेड, दिल्ली आणि अगदी सातासमुद्रापार कॅलिफोर्नियापर्यंत त्यांच्या कलेचा सुगंध पोहोचला. त्यांच्या हयातीत ज्या नावाचा डंका वाजला, तो त्यांच्या निधनानंतरही तितक्याच तेजाने घुमत आहे. कारण बाबी बांदेकर आज देहाने आपल्यात नसले, तरी त्यांच्या कलेचा आत्मा, त्यांची श्रद्धा आणि त्यांचा वारसा त्यांच्या पाच सुशिक्षित, पदवीधर, विवाहित कन्यांनी अत्यंत जिद्दीने, मेहनतीने, प्रेमाने आणि अभिमानाने पुढे नेला आहे.







दहा वर्षांच्या विष्णूची संघर्षगाथा
आयुष्याची खरी परीक्षा कधी सुरू होईल, याची जाणीव चौदा वर्षांच्या त्या मुलाला तेव्हा कुठे होती?
अवघ्या चौदाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. आई आणि पाच भावंडांची जबाबदारी मोठ्या मुलाच्या खांद्यावर आली. हे वय शाळेत जाण्याचे, भविष्याची स्वप्ने पाहण्याचे होते; पण विष्णूच्या वाट्याला मात्र परिस्थितीने जबाबदारीची कठोर शिदोरी दिली.
तुळससारख्या छोट्याशा गावात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे दिवसेंदिवस कठीण होत होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच काहीतरी मार्ग शोधला पाहिजे, या विचाराने विष्णूने गाव सोडले आणि मुंबई गाठली.
प्रभादेवी येथे राहणाऱ्या नात्यातील रामा मामांनी त्यांना आसरा दिला. परिस्थिती तिथेही सुखाची नव्हती; पण जगण्याची जिद्द मोठी होती.
उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करत असतानाच मनाच्या एका कोपऱ्यात कलाकार सतत जागा होता. कोकणातील माणूस आणि नाटक यांचे नाते अतूट. त्याचीच प्रचिती बाबींच्या जीवनातही आली. नाटकांचे पडदे रंगवणे, कलाकारांचा मेकअप करणे, नाटकांचे व्यवस्थापन पाहणे आणि त्यासोबत मूर्तिकाम करणे… असा त्यांचा संघर्षमय, पण कलेने समृद्ध होत जाणारा प्रवास सुरू झाला.
रंगकाम करणारे ते छोटे हात हळूहळू मातीला आकार देणारे समर्थ हात बनू लागले.
जबाबदारीने घडवलेला कर्ता पुरुष
काळ पुढे सरकत होता. गावाकडची भावंडे मोठी होत होती आणि विष्णूचे आयुष्यही हळूहळू स्थिरावू लागले.
मोठी बहीण वयात आल्यानंतर तिच्या विवाहाची जबाबदारी बाबींनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. यथायोग्य परिस्थितीनुरूप तिचे लग्न लावून दिले आणि त्या क्षणापासून ते केवळ भाऊ राहिले नाहीत—घरातील कर्ते झाले.
भावंडांमधील वयाचे अंतर फारसे नसल्यामुळे पुढील आयुष्याचा विचार करून आईने बाबींचे लग्न रत्नागिरीच्या रजनीगंधा यांच्याशी लावून दिले.
ही सप्तपदी बाबींच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरली.
रजनीगंधा त्यांच्या आयुष्याची केवळ सहचारिणी नव्हत्या; त्या त्यांच्या संघर्षाच्या, कलेच्या आणि संसाराच्या खंबीर सोबती ठरल्या.
टिळकनगर, चेंबूर आणि ‘बाबी बांदेकर’ या नावाचा जन्म
काही काळानंतर बाबी टिळकनगर, चेंबूर येथे स्थलांतरित झाले. आयुष्याच्या या टप्प्यावर राजन नायर, मधुकर देसाई, सुर्वे, भाई भोसले, शिंदे, खाडे, बेळणेकर अशा सहकाऱ्यांची साथ लाभली आणि दुसरीकडे रजनीगंधा यांची प्रेमळ, खंबीर साथ होती.
आतला कलाकार मात्र स्वस्थ बसत नव्हता.
सुरुवातीला भर्मासेल येथे, त्यानंतर भारत रेडिएटर येथे त्यांनी नोकरी केली; पण नोकरीत मन रमेना. कारण मातीशी असलेले त्यांचे नाते रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नव्हते.
शेवटी नोकरी सोडून त्यांनी स्वतःला पूर्णवेळ मूर्तिकलेला वाहून घेतले.
आणि सुरू झाला एका कलाकाराचा नव्हे, तर पुढे हजारो गणेशभक्तांच्या श्रद्धेचा भाग बनलेल्या ‘मूर्तिकार बाबी बांदेकर’ या नावाचा सुवर्णप्रवास.
पाच मुली — बाबींची पंचरत्ने
बाबी आणि रजनीगंधा यांना पाच मुली—
प्रतिभा, विमल, मनीषा, हेमा आणि तृप्ती.
बाबी त्यांना प्रेमाने आणि अभिमानाने ‘पंचरत्न’ म्हणत.
मुलगा नाही याची खंत बाबींना कधीच नव्हती. उलट, आपल्या मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि स्वावलंबी व्हावे, यावर त्यांचा कटाक्ष होता.
आज या पाचही बहिणी उच्चशिक्षित, पदवीधर आणि विवाहित आहेत.
लहानपणापासून त्यांनी आई-वडिलांचा संघर्ष पाहिला. बाबींचे कलेवरील प्रेम आणि रजनीगंधा यांची संसाराला दिलेली साथ पाहत त्या मोठ्या झाल्या. त्यामुळे त्यांची मूर्तिकलेशी नाळ जोडली जाणे हा योगायोग नव्हता—तो जणू पिढ्यान्पिढ्या वाहत आलेल्या संस्कारांचा स्वाभाविक विस्तार होता.
शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांच्या हातांनाही गणेशाच्या रूपाचे वेध लागले.
आज गणेश चित्र मंदिराचा भव्य डोलारा या पंचकन्या समर्थपणे सांभाळत आहेत.
पंचमहाभूतांचा साक्षात अविष्कार
गणेशाचे आणि दुर्गेचे रूप आपल्या हातांनी साकारणाऱ्या या पाच बहिणींकडे पाहिले की एक विचार मनात येतो—
बाबींच्या पंचरत्नांनी जणू पंचमहाभूतांनाच मूर्त स्वरूप दिले आहे.
माती, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांच्याप्रमाणे त्यांच्या कलेतही विविधता, लवचिकता, सामर्थ्य, सर्जनशीलता आणि व्यापकता आहे.
बाबींनी आपल्या वारसांकडे केवळ ‘मुली’ म्हणून पाहिले नाही; त्यांनी त्यांच्यात भविष्यातील सर्वोत्तम महिला मूर्तिकार पाहिला.
महिला आणि तेही पाच बहिणी, सर्व विवाहित, उच्चशिक्षित—आणि तरीही मातीशी असलेली नाळ तितकीच घट्ट!
हा प्रवास केवळ कौटुंबिक वारसा नाही; तो महिला सक्षमीकरणाचा, स्वावलंबनाचा आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेचा प्रेरणादायी आदर्श आहे.
“बाहेर तुम्ही काहीही असा… आत आलात की तुम्ही मातीचे!”
बाबींच्या कार्यशाळेची एक वेगळीच शिस्त होती.
पंचरत्नांपैकी प्रत्येक जण उच्चशिक्षित, पदवीधर, व्यावसायिक आयुष्यात सक्षम. त्यांचे जावईही उच्चशिक्षित.
मात्र कार्यशाळेत प्रवेश करताना एकच नियम—
“तुम्ही जे काही आहात, ते तुमच्या चपलांसोबत बाहेर ठेवा. आत आलात की तुम्ही फक्त मातीचे.”
ही केवळ सूचना नव्हती; हा बाबींच्या कलेचा संस्कार होता.
माती अंगाला लागली पाहिजे. हात मातीने माखले पाहिजेत. कलाकाराने स्वतः काम केले पाहिजे.
म्हणूनच पंचरत्नांपैकी प्रत्येकाला मूर्तिकलेच्या प्रत्येक अंगाचे ज्ञान आहे.
सहा इंचांपासून अठरा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती त्या घडवतात. सार्वजनिक गणेशोत्सवातील भव्य मूर्ती असो किंवा घरगुती गणपतीचे सुबक रूप—प्रत्येक मूर्तीमध्ये श्रद्धा, सौंदर्य आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम दिसतो.
मातीला आकार देण्यापासून साचा तयार करण्यापर्यंत, प्लास्टर, रबर किंवा फायबरच्या साच्याचा योग्य वापर, मूर्तीला रंग देणे, डोळे साकारणे, दागिने चढवणे, आसन सजवणे, लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था, कारागिरांचे व्यवस्थापन आणि गणेशभक्तांशी समन्वय—कार्यशाळेतील प्रत्येक जबाबदारी पंचरत्नांनी आत्मसात केली आहे.
कारण बाबींचा एकच संस्कार होता—
“सर्वांना सर्व कामे आली पाहिजेत.”
बाबी — स्वभावाने हट्टी, मनाने प्रेमळ
ते प्रेमळ होते; पण त्यांचे प्रेम शब्दांपेक्षा कृतीतून जाणवायचे.
ते सर्वांची काळजी घेणारे होते. त्यांचा हात नेहमी देणारा होता. आणि कलेशी त्यांची निष्ठा अखंड होती.
माती त्यांच्या हातात आली की ती केवळ माती राहत नसे; ती श्रद्धा बनत असे, रूप बनत असे, आणि भक्ताच्या भावनेला आकार देत असे.
१२ नोव्हेंबर २०१५ — देह गेला, वारसा राहिला
१२ नोव्हेंबर २०१५, दिवाळी पाडवा.
या मंगलदिनी बाबी बांदेकरांनी जगाचा निरोप घेतला.
तोपर्यंत चार मुलींची लग्ने झाली होती. पुढच्याच वर्षी रजनीगंधा यांनीही बाबींच्या पाठोपाठ देवाघरी जाताना आपल्या पाचव्या कन्या तृप्तीचे लग्न लावून दिले.
एका कुटुंबाचा आधारस्तंभ निघून गेला; पण त्यांनी घडवलेली पाच समर्थ माणसे उभी होती.
बाबी गेले… पण बाबींची कला गेली नाही. बाबी गेले… पण त्यांची श्रद्धा गेली नाही. बाबी गेले… पण ‘बाबी बांदेकर’ हे नाव गेले नाही.
कारण ते नाव आज त्यांच्या पंचरत्नांच्या हातातून पुन्हा पुन्हा जन्म घेत आहे
टाईमलाईन
१० जुलै १९४७
जन्म
बाबी बांदेकर — विष्णू भगवान बांदेकर यांचा जन्म. कोकणातील मुळांपासून पुढे मुंबई आणि दूरवर प्रसन्न गणेशरूप घडवणारे कलाकार.
१९६१
वडिलांचे निधन
मूर्तिकार भगवान यांचे निधन. तरुण बाबी वडिलांचा वारसा घेऊन ही कला लवकरच मुंबईत नेणार होते.
१९६९
गणेश चित्र मंदिरची स्थापना
चेंबूरमध्ये गणेश चित्र मंदिराची स्थापना. अमर महाल परिसरातून बाबींच्या कार्यशाळेचा भक्ती आणि मातीचा सार्वजनिक प्रवास सुरू.
१९६९
पहिली मूर्ती, पहिले कौतुक
चेंबूरच्या हितचिंतकांच्या प्रोत्साहनाने महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळासाठी आठ फूट गणपती. त्या वर्षी एकच मूर्ती — पण फोटोसह प्रसिद्धी.
२५ मे १९७५
लग्न
बाबी बांदेकर यांचा सौ. रजनीगंधा यांच्याशी विवाह. कार्यशाळेच्या हंगामात कला, काळजी आणि उत्सवात त्यांचा सिंहाचा वाटा.

१९७०–८०
कारखाना आणि विस्तार
कामगारांच्या साथीने सार्वजनिक व घरगुती मूर्ती मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुणे, गोवा आणि दूरवर. फायबर ग्लास जोडले; नवरात्रीनंतरचे दिवस कामाचेच.
१९९२
शताब्दी सन्मान
सह्याद्री क्रिडा मंडळाच्या बारा फूट मूर्तीला ओरिएंट–सामना मुंबई प्रथम. त्याच हंगामात चेंबूर महापौर चषक — कलेला नागरी सलाम.

१९९३
लोकसत्ता सर्वोत्कृष्ट मूर्तिकार
गिरनार लोकसत्ता गणेशदर्शनात वाशी–पनवेल विभागात बाबी बांदेकर सर्वोत्कृष्ट मूर्तिकार — प्रेरणा सेवा मंडळ, सेक्टर-६ साठी बारा फूट आसनस्थ मूर्ती.

अग्निसंकट
कारखान्याला आग
चेंबूर येथील श्रीगणेश चित्र मंदिर कारखाना आगीत भस्मसात — साचे, मूर्ती, लाकूड, रंग, प्लास्टरचे नुकसान. उत्सवाच्या तोंडावर कारखाना पुन्हा उभा करण्याची हाक.
आज
पंचरत्ने पुढे नेतात
२०१५ नंतर पंचकन्या गणेश चित्र मंदिर सांभाळतात — शिक्षण, कला आणि भक्ती एका जिवंत कार्यशाळेत एकत्र.
बाबी बांदेकरांच्या आठवणी
दादा — एक कलातपस्वी
माती, साधना, माणुसकी आणि वारशाची माझ्या मनातली कहाणी

“मातीला आकार देताना, त्यांनी आयुष्य घडवलं; कला जपताना त्यांनी, माणुसकीचं नातं जपलं.”
काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्या मनाचा एक भाग होऊन जातात. काळ पुढे जातो, माणसं दूर जातात, पण त्यांची आठवण मात्र मनात तितकीच जिवंत राहते. माझ्यासाठी बाबी बांदेकर म्हणजे ‘दादा’ आणि त्यांच्या अर्धांगिनी रजनीगंधा म्हणजे ‘आई’. आज हे दोघेही आपल्यात नाहीत, ही जाणीव मनाला हळवी करून जाते; पण त्यांच्या आठवणींना उजाळा दिला की मनात दुःखाबरोबरच एक विलक्षण समाधान आणि अभिमानही दाटून येतो.
“ज्यांच्या जाण्याने घर रिकामं होतं, ते माणूस नसतातच फक्त; ते घराच्या आठवणींचा, मनाच्या कोपऱ्यातला एक भाग असतात.”
दादा म्हणजे माझ्यासाठी केवळ एक प्रसिद्ध मूर्तिकार नव्हते. ते एक प्रेमळ, साधे, मनमिळावू आणि कलेशी प्रामाणिक असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या हातात माती आली की ती केवळ माती राहत नसे. त्या मातीला आकार देताना त्यांची कल्पनाशक्ती, श्रद्धा, अनुभव आणि मन त्यात मिसळत असे. गणेशमूर्ती घडवणं हा त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय नव्हता; ती त्यांची साधना होती, त्यांची उपासना होती.

त्यांच्या कलेत मला नेहमी एक विशेष गोष्ट जाणवायची—कलेचा मोठेपणा होता, पण कलाकाराचा गर्व नव्हता. त्यांच्या कलेला पारितोषिकं मिळाली, सन्मान मिळाले, त्यांच्या प्रतिभेची दखल घेतली गेली; पण या यशाने दादांच्या पायाखालची जमीन कधीच सरकली नाही. पुरस्कारांनी त्यांची ओळख मोठी केली, पण त्यांच्या मनातला साधेपणा तसाच राहिला. कितीही उंची गाठली तरी मुळांशी जोडलेलं राहणं हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.
दादांची खरी उंची त्यांच्या पुरस्कारांमध्ये नव्हती; ती त्यांच्या साधेपणात होती.
मला नेहमी वाटतं, कलाकाराची कला सगळ्यांना दिसते; पण त्या कलेमागची माणसं आणि त्याग फार कमी लोकांना दिसतात. दादांच्या आयुष्यात ही भूमिका निभावणारी व्यक्ती म्हणजे आई—रजनीगंधा.
“सावली कधी बोलत नाही, पण उन्हाची तीव्रता जाणवू देत नाही.”
आई दादांच्या आयुष्याची अशीच एक शांत सावली होती. दादा कलेत रमले, मातीशी संवाद साधत राहिले, मूर्ती घडवत राहिले; आणि आईनेही मातीशी संवाद साधत, संसार, घर, मुलं आणि असंख्य जबाबदाऱ्या सांभाळत त्यांच्या या कलाप्रवासाला आधार दिला. तिचं योगदान कदाचित कुठल्याही पारितोषिकात लिहिलं गेलं नसेल, पण दादांच्या प्रत्येक यशामागे तिच्या सहजीवनाचा वाटा होता.
म्हणून दादांची कहाणी मला कधीच एकट्या कलाकाराची वाटत नाही. ती दादा आणि आईच्या सहजीवनाची कहाणी आहे. एकाने माती घडवली; दुसरीने संसार घडवला. एकाने मूर्तींना आकार दिला; दुसरीने त्या कलेला जगण्याची जागा दिली.
आणि या सुंदर सहजीवनातून उमललेली पाच फुलं म्हणजे त्यांच्या पाच मुली—त्यांची पंचरत्नं.
प्रतिभा, विमल, मनीषा, हेमा आणि तृप्ती

पाचही मुली उच्चशिक्षित आहेत. प्रत्येक जणीने स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या संसाराची स्वतंत्र वाट निवडली आहे. विवाहानंतर स्वतःचं घर, कुटुंब आणि मुलांच्या जबाबदाऱ्या त्या समर्थपणे पार पाडत आहेत. पण या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी बाबांनी दिलेला मूर्तिकलेचा वारसा कधीही मागे पडू दिला नाही.
ही गोष्ट माझ्या मनाला विशेष स्पर्शून जाते.
कारण वारसा मिळणं वेगळं आणि तो जपणं वेगळं. दादांनी त्यांना केवळ कला दिली नाही; त्यांनी कलेशी नातं कसं ठेवायचं, मेहनत कशी करायची आणि आपल्या मुळांना विसरायचं नाही, हे शिकवलं. त्या संस्कारांना पंचरत्नांनी आपल्या आयुष्यात जागा दिली आणि आज त्या आपल्या वडिलांचा कलावारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.
“दीप जरी विझला तरी, ज्योत हरवत नाही; संस्कारांची वात जिवंत असेल, तर परंपरा संपत नाही.”
दादांचे हात आज थांबले आहेत. आईची मायेची सावलीही आता प्रत्यक्ष अनुभवता येत नाही. पण त्यांच्या पंचरत्नांच्या हातून दादांची कला पुढे चालली आहे. त्यांच्या कामात दादांच्या हातांचा स्पर्श, आईच्या संस्कारांची ऊब आणि एका संपूर्ण कुटुंबाच्या परंपरेचा सुगंध जाणवतो.
माझ्या दृष्टीने दादांची हीच सर्वांत मोठी कमाई आहे.
पारितोषिकं त्यांच्या कलेला मिळाली; पण पंचरत्नं त्यांच्या संस्कारांना मिळालेलं सर्वांत मोठं पारितोषिक आहे.
आज मागे वळून पाहताना मला दादांचा संपूर्ण प्रवास एका सुंदर वर्तुळासारखा वाटतो. एका साध्या मातीपासून सुरू झालेला प्रवास मूर्तींपर्यंत पोहोचला; मूर्तींपासून सन्मानांपर्यंत पोहोचला; आणि सन्मानांपलीकडे जाऊन तो आता त्यांच्या मुलींच्या रूपाने पुढच्या पिढीकडे पोहोचत आहे.
दादा गेले, पण दादांची कला गेली नाही. आई गेली, पण आईची माया हरवली नाही. त्यांनी घडवलेली माणसं आणि दिलेले संस्कार आजही जिवंत आहेत.
म्हणूनच दादांची आठवण आली की मनात केवळ दुःख येत नाही. उलट एक अभिमानाची भावना मनात दाटून येते—मी अशा एका माणसाला ‘दादा’ म्हणू शकलो आणि त्यांच्या अर्धांगिनीला ‘आई’ म्हणून अनुभवू शकलो, हे माझं भाग्य आहे.
“माणसं जातात, आठवणी राहतात; कला थांबते, पण संस्कार चालत राहतात. आणि प्रेमाने जोडलेली नाती— काळाच्या पलीकडेही जिवंत राहतात.”
आज दादांसाठी माझ्या मनात एकच शब्द आहे—कलातपस्वी. आणि आईसाठी—त्यांच्या तपस्येची शांत, प्रेमळ सावली. तर पंचरत्नांसाठी—त्या तपस्येची पुढची उजळलेली पिढी.
दादांनी मातीला आकार दिला; आईने त्या कलेला घर दिलं; आणि पंचरत्नांनी त्या कलेला पुढचा प्रवास दिला. यापेक्षा सुंदर वारसा आणखी कोणता असू शकतो?
दादा, तुमचे हात आता मातीला स्पर्श करत नाहीत; पण तुमच्या हातांनी घडवलेली कला आजही बोलते आहे. आई, तुझ्या मायेची सावली आता दिसत नाही; पण तुझ्या संस्कारांची ऊब अजून जाणवते आहे. आणि तुमची पंचरत्नं तुमची कला पुढे नेत आहेत—हीच तुमच्या दोघांच्या आयुष्याला मिळालेली सर्वांत सुंदर आदरांजली आहे.
“मातीला आकार देणारे हात थांबले, पण त्या हातांची कला थांबली नाही; सावली दूर गेली तरी, तिची माया कमी झाली नाही; आणि पंचरत्नांच्या हातून ती ज्योत आजही तेवत आहे…”
दादा आणि आई—माझा मनःपूर्वक नमस्कार.
— विनायक
मनात जपलेल्या दादा आणि आईच्या आठवणींतून… 🌺
छायाचित्रे






